मुंबई : आठवीपर्यंतची ढक्कलगाडीची प्रथा आता बंद होणार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणांच्या विधेयकाला बुधवारी केंद्रीय कॅबिनेटनं मंजूरी दिली.
नव्या तरतुदीनुसार पाचवी आणि आठवीत मुलांना नापास करून पुन्हा त्याच वर्गात बसवता येणं शक्य होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातील सध्याच्या तरतूदीनुसार पहिली ते आठवी सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकणे बंधनकारक आहे. पण या तरतूदीमुळे शिक्षणाचा दर्जा सातत्यानं खालावत चालल्याचं अनेक संशोधनांमधून पुढे आलंय. त्यालाच अनुसरून ढक्कलगाडीची ही प्रथा बंद करणारं सुधारणा विधेयक तयार करण्यात आलंय.
हे विधेयक आता कॅबिनेटच्या मंजूरीनंतर संसदेत सादर करण्यात येणार आहे. नव्या तरतुदी नुसार पाचवी आणि आठवीत एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला, तर त्याच वर्षी पुन्हा एकदा परीक्षा घेऊन पास होण्याची संधी दिली जाईल. पण तिथेही अपयश आलं, तर मात्र विद्यार्थ्याला त्याच इयत्तेत पुन्हा बसावं लागेल.