विशाल सिंह झी २४ तास मुंबई : तुम्ही पीएमसीचे खातेदार असाल तर तुमच्या कष्टाचा पैसा कदाचित अमेरिकेत गेला असेल. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. 'झी २४ तास'च्या हाती लागलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पीएमसी बँकेचा पैसा हा अमेरिकेत नेल्याचा संशय आहे. पीएमसी घोटाळ्याचा माजी अध्यक्ष वरियम सिंग यानं बँक घोटाळ्यातला काही पैसा अमेरिकेतल्या उद्योगधंद्यात गुंतवल्याची माहिती आहे. ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. वरियम सिंगच्या कुटुंबीयांच्या नावेही अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्यात आलीय. बँक बुडणार किंवा बँक बुडाल्यावर पळून जाण्याची ही पूर्वतयारी तर नव्हती ना? याचा पोलीस आता तपास करत आहेत.
वरियम सिंग याची बँक घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. बँकेत खातेदारांनी गुंतवलेला पैसा तो 'एचडीआयएल'च्या झोळीत टाकत असल्याची माहिती समोर आलीय.
वरियम सिंगचा पीएमसी घोटाळ्यात डबल रोल होता. वरियम सिंग 'एचडीआयएल'चा संचालक होता. दुसरीकडं तो बँकेचा चेअरमन होता. 'एचडीआयएल'ची कर्ज प्रस्ताव तो संचालक म्हणून तयार करायचा आणि पीएमसी बँकेचा चेअरमन म्हणून ही कर्ज मंजूर करायचा. बँकेचा एमडी जॉय थॉमस हा वरियम सिंगच्या सांगण्यानुसार पैसा 'एचडीआयएल'कडे वळते करायचा की तो थेट वाधवाच्या संपर्कात होता हे पोलीस तपासत आहेत.
अमेरिकेत असलेली गुंतवणूक ही वाधवाचीही असू शकते किंवा 'तळे राखी तो पाणी चाखी' या हिशोबानं वरियम सिंगनंही घोटाळ्याच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याचा अंदाज आहे. वरियम सिंगची सध्या पोलीस चौकशी सुरु आहे. या चौकशीतच ही माहिती समोर येईल. सामान्यांच्या घामाच्या कष्टाच्या पैशांवर 'एचडीआयएल' बिल्डर आणि वाधवांनी कसा डल्ला मारला? हे या प्रकरणातून समोर आलंय.