मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस, अतिवृष्टीची शक्यता

वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय

Updated: Aug 3, 2019, 09:52 AM IST
मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस, अतिवृष्टीची शक्यता title=

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून पावसानं जोरदार बॅटिंग केलीय. सखल भागात सकाळी पाणी साचलेलं दिसतंय. आज आणि उद्या कोकण किनारपट्टीस मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. समुद्रालाही आज दुपारी मोठी भरती येणार असल्यानं नागरिकांना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.   

भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्र, कोकण आणि गोवामध्ये रेड अलर्ट जारी केलीय. जोरदार वाऱ्यांमुळे या भागात अतिवृष्टीची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येतोय. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. समुद्रानजिक राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

 

मुंबईतील विविध भागात रात्रभर पाऊस सुरु आहे. वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय. अंधेरी आणि मालाड सबवे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आलीय. रात्रभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही सखल पाणी साचलंय.  दहिसर पूर्व इथल्या काही इमारतीमध्ये पाणी भरलंय.

लोकल रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम दिसून येतोय. जवळपास २०-२५ मिनिटे उशिरानं वाहतूक सुरू आहे. 

दरम्यान, उत्तर कोकणात, रायगड भागात मुसळधार ते अतिमुसळधार, मुंबई ठाणे पालघर ते रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर कमी दाबाच्या पट्टयामुळे नांदेड औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.