Raymond MD Shares Picture With Father: एकेकाळी कापड व्यापारामध्ये आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रेमंड लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या वडिलांबरोबरचा वाद मिटवला आहे. मागील अनेक वर्षांपासून पिता-पुत्रांमध्ये वाद होता. पण बुधवारी गौतम सिंघानिया यांनी वडील विजयपथ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत हा वाद संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहे.
गौतम सिंघानियांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतम सिंघानिया आणि विजयपथ सिंघानिया एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचं दिसत आहे. "माझे वडील आज घरी आल्याने फार आनंद होत आहे. आज मी त्यांचा अशिर्वाद घेतला. तुम्हाला कायमच चांगले आरोग्य लाभो," अशी कॅप्शन गौतम सिंघानियांनी या फोटोला दिली आहे.
गौतम सिंघानिया सध्या त्यांच्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आहेत. नवाझ मोदीपासून घटस्फोट हवा असल्याच्या खटल्यामध्ये नवाझ यांनी गौतम यांच्या संपत्तीमधील 75 टक्के वाटा पोटगी म्हणून मागितला आहे. आपली आर्थिक चणचण होऊ नये आणि निहारिका, निशा या दोन्ही मुलींचा संभाळ करता यावा यासाठी एवढी रक्कम आपल्याला हवी आहे, असा युक्तीवाद नवाझ यांनी केला आहे. गौतम सिंघानिया हे सध्या रेमंडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. गौतम यांनी 13 नोव्हेंबर 2023 रोजी पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांनीही लग्नाच्या 32 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 11 हजार कोटींच्या संपत्तीपैकी 75 टक्के संपत्ती म्हणजेच 8745 कोटी रुपयांची मागणी नवाज यांनी केली आहे.
— Gautam Singhania (@SinghaniaGautam) November 13, 2023
2023 साली विजयपथ यांनी 'बिझनेस टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलगा गौतमने आपल्याकडील सर्वकाही घेऊन टाकल्याचा आरोप केला होता. आपल्याकडे असलेल्या शुल्लक बचतीच्या पैशांमध्ये आपण गुजराण करत आहोत, असंही विजयपथ म्हणाले होते. "माझ्या हातात आता माझा कोणताही बिझनेस नाही. त्याने मला कंपनीतील काही हिस्सा देण्याचा शब्द दिला होता. मात्र त्याने दिलेला शब्द पाळला नाही आणि 2 सेकंदांमध्ये शब्द फिरवला. चुकून माझ्या नावावर काही पैसे त्याच्याकडून राहून गेले आणि आता त्यावरच मी जगत आहे. ते नसते तर आज मी रस्त्यावर आलो असतो. मला रस्त्यावर पाहून तो सुखी झाला असता. तो त्याच्या पत्नीला आणि बापाला अशाप्रकारची वागणूक देऊ शकतो तर त्याचं नेमकं काय सुरु आहे मला सांगता येणार नाही," असं विजयपथ म्हणाले. विजयपथ हे 2015 साली रेमण्ड कंपनीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले. मात्र या दोघांमधील वाद आता 9 वर्षानंतर संपुष्टात आला आहे. गौतम सिंघानियांची ही नवी पोस्ट पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
एवढ्या गोंधळानंतर तुमच्यातील वाद मिटले हे कौतुकास्पद आहे, असं एकाने म्हटलं आहे. तुझ्या वडिलांना आणि तुला आनंद मिळो. आता त्यांना भरपूर प्रेम द्या, असं अन्य एकाने म्हटलं आहे.