मुंबई : राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. सरकार आणि डॉक्टरांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक झाली. त्यानंतर संपकरी निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला. आता संपकरी डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत. विद्यावेतनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी मार्डने हा संप पुकारला होता. मात्र राज्यातली गंभीर पूरस्थिती आणि त्यामुळे रोग उद्भवण्याची शक्यता याचा विचार करुन, मार्डने आपले आंदोलन ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले आहे. तोपर्यंत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा मार्डने दिला आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एमएनसी) विधेयकाला विरोध, विद्यावेतन आणि अन्य मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी रुग्णसेवा विस्कळीत झाली. मेडिकल, मेयोतील ३० किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या होत्या. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशने गुरुवारी खासगी डॉक्टरांचा संप स्थगित केल्याचे जाहीर केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
निवासी डॉक्टरांनी बुधवारी सर्व प्रकारची सेवा बंद केली होती. अधिष्ठाता कार्यालय परिसरात रॅली काढून शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. दोन्ही रुग्णालय प्रशासनाने मार्डच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून संप न करण्याची विनंती केली. परंतु हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात भजन करून, भिक्षा मागून उपस्थितांचे लक्ष वेधले. मात्र, राज्य सरकारने मेस्माअंतर्गत कारवाईचा बडगा उगरण्याचा इशारा दिला होता. 'मार्ड' संघटनेच्या संपाच्या घोषणेला प्रतिसाद देत संपावर गेलेल्या राज्यातील संपकरी डॉक्टरांवर 'अत्यावश्यक सेवा कायद्या'नुसार (मेस्मा) कारवाई करण्यात येईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. डॉक्टरांच्या या संपाचा फटका अनेक रुग्णांना सहन करावा लागला होता.