मुंबई : भाजपा-शिवसेनेत जेवढं ठरलं आहे, तेवढं मार्गी लावा. जेवढं ठरलं आहे तेवढंच करा, त्यावरती काहीही नको, एखादं महामंडळही नको, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, ती भाजपाने पूर्ण करावी, आमच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच शिवसेना काहीही झालं, तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होवू देणार नाही, कारण लोकांनी एक जनमत दिलं आहे, त्याचा आदर करणे महत्वाचं आहे. महाराष्ट्र हे देशात एक महत्वाचं राज्य आहे. म्हणून राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती जास्त दिवस योग्य नसल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच भाजपाशी वारंवार अशी चर्चा करण्यास अर्थ नाही, ज्या चर्चेतून काहीही निघणार नसेल, जेवढं ठरलंय तेवढं भाजपाने मार्गी लावावं, तसेच शरद पवार जर म्हणत असतील की, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला कोणताही पर्याय मिळाला नाही, तर ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, कारण त्यांच्यात काहीच ठरलेलं नाही.