मुंबई : कर्जमाफीवर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देतांना, सरसकट कर्जमाफीदिल्याबद्दल सरकारचं अभिनंदनास पात्र असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब असल्याचं पवारांनी म्हटलंय, पण सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफी केली आहे. शिवाय त्याला काही निकषही आहेत. त्यामुळे या तीन शब्दांविषयी चिंता वाटते. त्यामुळे सरकारने सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी, असंही शरद पवार म्हटलं आहे.
सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकऱ्यांच्या पदरात सकारात्मक मिळालं. शिवाय सरकारनेही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
दोन प्रकारचे कर्ज असतात. एक अल्प मुदतीचं कर्ज असतं आणि दुसरं दीर्घ मुदतीचं कर्ज असंत. मात्र सरकारने सरसकट कर्जमाफी केली आहे. त्यामुळे सर्वांचंच कर्ज माफ होईल, म्हणून सरकार अभिनंदनाला पात्र आहे. फक्त आता या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असंही शरद पवार म्हणाले.
सरकारने खरीपाच्या तोंडावर कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्यापासून नव्याने कर्ज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर नव्याने कर्ज पदरात पाडून घ्यावं, यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे लवकर कामाला लागा, असंही पवारांनी शेतकऱ्यांना म्हटलं आहे.