मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता आज शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे गृह मंत्रालयाची नजर आहे. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी आपण ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारणार आहे, असं सांगितलं होतं. दरम्यान कार्यालय परिसरात कोणत्याही कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शांतता राखली जाईल याची काळजी घेण्यात यावी. पोलीस प्रशासन आणि इतर सहकारी यंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.