मुंबई : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) काही नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नक्कल केल्याप्रकरणी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
शिवसेनेत बंडखोरीनंतर दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. पण टीका करत असताना पातळी सोडली जात आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक लक्ष केले जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली गेली. त्यामुळे सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात झाली.
दुसरीकडे विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आलीये.
शिंदे गटाचे प्रवक्ते, नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी बोलताना म्हटलं की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तेव्हा त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून जेलमध्ये टाकण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. तेव्हा तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य कुठे होतं?
कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , पंतप्रधान, राष्ट्रपती ज्या महिला आहेत यांची टिंगल टवाळी केली गेली. महिला राष्ट्रपती यांच्या नावावरून मस्करी करणे अशी वक्तव्य मेळाव्यात करण्यात आली. जैसी करणी वैसी भरणी. नारायण राणे यांच्यावेळी तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य विसरला होतात. त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने आरोप, टिंगल टवाळी ठाण्याच्या सभेत नेत्यांनी केली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल केलेले आहेत.
ही दिशा आपणच दाखवलेली आहे या महाराष्ट्राला आपण दाखवलेल्या दिशेनेच आपल्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता आरडाओरड करण्याची गरज नाही.