मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा तिढा अखेर सुटला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवतील. दोन्ही पक्षांकडून लवकरच युतीसंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना १९९५ साली झालेल्या सूत्राप्रमाणे जागावाटप करण्यावर अडून बसली होती. मात्र, बऱ्याच चर्चेनंतर शिवसेनेची समजूत काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ असे सूत्र निश्चित झाले आहे. तर विधानसभेच्या २८८ जागांपैकी १४५ जागांवर भाजप आणि १४३ जागा शिवसेनेकडून लढवण्यात येतील. त्यासाठी भाजपने आपल्या ताब्यातील काही मतदारसंघ सोडण्याची तयारीही दाखवल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पडद्यामागे बोलणी सुरु होती. दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षांनी अनेकदा स्वबळाचे नारेही दिले. मात्र, एकूणच राजकीय परिस्थिती पाहत दोन्ही पक्ष समेट करतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. त्यानुसार दोन्ही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु होती. या चर्चेअंती अनेक रंजक निरीक्षणे समोर आली आहेत. शिवसेनेला विदर्भात स्वारस्य नाही. त्याऐवजी शिवसेनेला मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातील जागांमध्ये अधिक रस आहे. सध्या पुणे आणि नाशिक शहरात शिवसेनेकडे एकही विधानसभेची जागा नाही. त्यामुळे जागावाटपात या परिसरातील भाजपच्या ताब्यातील काही मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडले जाऊ शकतात.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत प्रसारमाध्यमांसमोर आक्रमकपणे स्वबळाची भाषा करत आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या एकदिवसीय उपोषणाच्या व्यासपीठावरही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राऊत यांची एकूणच भूमिका युतीविरोध असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजप नेत्यांकडून राऊत यांचीही समजूत काढली जाण्याची शक्यता आहे.
मात्र, दुसरीकडे शिवसेनेने भाजपशी अशी कोणतीही चर्चा झाल्याचा इन्कार केला. भाजपकडूनच अशा बातम्या जाणुनबूजून पेरल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.