मुंबई: २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेने त्यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला असेल. मात्र, शिवसेनेने आम्हाला तशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी 'पीटीआय' वृत्तसंस्थेशी बोलताना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नवाब मलिक यांनी या वृत्ताचा साफ इन्कार केला. त्यावेळी शिवसेनेसोबत आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती. त्यांची काँग्रेसशी चर्चा झाली असावी, असे मलिक यांनी म्हटले.
२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण
तर भाजप नेते माधव भंडारी यांनी या दाव्यात तथ्य असू शकते, असे म्हटले. पृथ्वीराज चव्हाण हे जबाबदार आणि मोजूनमापून बोलणारी व्यक्ती आहेत. आपण काय बोलतो याचे त्यांना भान असते. उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार त्यांच्याबाबतीत होत नाही. मात्र, त्यावेळी तीन पक्षांची खिचडी शिजली नाही. यावेळी ती शिजली इतकेच, असे भंडारी यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना आता या सगळ्यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेला ६३ तर भाजपाला १२२ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस ४१ तर राष्ट्रवादी ४२ जागांवर यश मिळवले होते.