मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य भेटीआधीत सामनामधून नाणारच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष करण्यात आलंय. नाणारची आणीबाणी या अग्रलेखात भाजपवर खरपूस टीका करण्यात आलीय. नाणार प्रकल्प लादणं म्हणजे आणीबाणी आहे, तो लादून बघाच आमचं आव्हान आहे, असा इशारा शिवसेनेनं सामनामधून दिलाय. कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. तसा प्रयत्न कराल तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू असे सामनातून म्हटले आहे.
या भकभकणाऱ्या विषप्रकल्पामुळे लोकांना कॅन्सर, दमा व इतर छातीच्या विकारांना सामोरे जावे लागेल अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील स्वच्छ हवा आणि पाण्याचे विषात रूपांतर करणाऱ्या प्रकल्पास जनतेचा विरोध असतानाही तो लादला जात असेल, जनतेचा विरोध पायदळी तुडवला जात असेल तर ही आणीबाणी असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल करून जगाचा थरकाप उडवला तसे कोकणी बांधवांना त्यांच्या घरादारांसह, शेतजमिनीसह विषारी गॅस चेंबरमध्ये मारण्याचा हा कट असल्याची टीका भाजपावर करण्यात आली.‘नाणार’ हे कोकणचे ‘गॅस चेंबर’ होईल म्हणून आमचा विरोध आहे आणि राहणार अशी भूमिका शिवसेनेने पुन्हा मांडली आहे.