मुंबई : भाजपला केंद्रात पंतप्रधान हवा असेल तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे हवं असं म्हणत शिवसेनेनं भाजपसमोर युतीसाठी नवी अट ठेवली आहे. युती हवी असेल तर केंद्रात तुम्ही मोठे, राज्यात आम्ही ही भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. युतीची चर्चा देवाणघेवाणीतून होत असते, माझं ते माझं आणि तुमचं तेही माझ्या बापाचं अशा भूमिकेतून युतीची चर्चा होत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. २०१४ मध्ये कुणाच्या काही जागा वाढल्या म्हणून कुणी मोठे भाऊ होत नाही. अन्यथा शिवसेनेने स्वबळाची पूर्ण तयारी केली आहे. युतीची चर्चा आम्ही सुरु केलेली नाही असंही राऊत म्हणाले. मातोश्रीवर कुणी येणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना शिवसेना - भाजपची युती होणार की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे. असं असताना जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. तर दुसरीकडे भाजपचे सर्व दावे शिवसेनेकडून खोडून काढले जात आहेत. शिवसेना-भाजपची युती होणार का? हा विषय राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्यानंतर यावर आता भाजप काय निर्णय़ घेते हे देखील पाहावं लागेल.
राज्यात मोठा भाऊ आपणच आहोत अशी वक्तव्य करून जास्त जागा पदरात पडल्या तरच शिवसेना भाजपबरोबर युती करेल असे संकेत शिवसेनेचे नेते देत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून मात्र जागावाटपाची चर्चा पूर्ण झाले असून फॉर्म्युलाही निश्चित झाला असल्याची माहिती अनधिकृतपणे माध्यमांना दिली जात आहे. शिवसेनेबरोबर युती होणारच असा दावा भाजपचे अनेक नेते खाजगीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना करत आहेत. त्यापुढे जाऊन लोकसभेत भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा, तर विधानसभेत भाजप 145 आणि शिवसेना 143 जागा लढवणार असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार युतीबाबत देवेंद फडणवीस आणि अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली आहे. या चर्चेत शिवसेनेने आधी विधानसभेचं जागावाटप पूर्ण करावं, विधानसभेत 1995 चा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करावा त्यानुसार शिवसेना 171 आणि भाजपा 116 जागा असे जागावाटप असावे अशी शिवसेनेची मागणी आहे.
मात्र या चर्चेतूनही युतीचा जागावाटपाची बोलणी पुढे गेलेली नाही. भाजपकडून जागावाटपासंदर्भात अथवा फॉर्मुला संदर्भात केले जाणारे दावे शिवसेनेने स्पष्टपणे खोडून काढले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून निश्चित काय सुरू आहे याबाबत संदिग्धता कायम आहे. दोन्ही पक्षाचे नेते यासंदर्भात माध्यमांना अधिकृत भूमिका मात्र सांगायला तयार नाहीत.