मुंबई : लोकलमध्ये स्टंटबाजांचे माकडचाळे अजूनही संपलेले नाहीत. हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. मुंबईतल्या लोकलमधील हे जिवघेणे स्टंट कधी थांबणार असा सवाल आता विचारला जातोय.
मुंबईतली लोकल प्रवासासाठी की स्टंटबाजांसाठी असा प्रश्न हे स्टंट पाहाताना कुणालाही पडेल. लोकलमध्ये गर्दी असो की नसो स्टंटबाजांचे माकडचाळे सुरूच असतात. धावत्या लोकलमध्ये मोहम्मद मोमीन मुस्तफा स्टंटबाजी करत होता. मोहम्मद हार्बर रेल्वेच्या चेंबूर ते वडाळा स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाजात उभा होता. तो बाहेर लोंबकळत होताच शिवाय दरवाजातील दांड्यावर पोलडांन्सही करत होता.
रेल्वेच्या खांबाला स्पर्श करण्यासाठी एकदा तो लोकलबाहेर वाकला. त्यानंतर रेल्वेच्या एका पुलाच्या भिंतीलाही त्यानं स्पर्श केला. मुस्तफाचे हे सगळे माकडचाळे लोकलच्या डब्यात साध्या वेशात उभ्या असलेल्या दोघा पोलिसांनी चित्रित केले. स्टेशन आल्यावर मुस्तफाची पोलिसांनी गचांडी वळली. आतापर्यंत शेकडो स्टंटबाजांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. कारवाईनंतर एक दोन दिवस हे स्टंटबाज गायब होतात. त्यानंतर पुन्हा तेच स्टंट सुरू होतात. आताच्या कारवाईनंतरही पुन्हा स्टंटबाजी होणार नाही याची शाश्वती नाही.