मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच पार्थ पवार यांना पक्षातर्फे मावळमधून उमेदवारी देण्यास अनुकूलता दर्शविली नव्हती. मात्र, या सगळ्यानंतरही अजित पवार यांनी अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी पार्थ यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
मात्र, आता सुप्रिया सुळे यांनी पुढे येत घरातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे हे पक्षासाठी चांगले आहे. आम्ही तिकिटे लादणार नाही. तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पार्थने भविष्यात राजकारणात यायची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना उमेदवारी दिली जाईल का, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. मात्र, त्यांनी त्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. आमची मावळची बैठक झाली. त्यात पार्थने कोणतीच इच्छा व्यक्त केली नाही. भविष्यात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.