प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : अवघ्या दहा वर्षाच्या संध्या गंगावणे या मुलीने आपल्या लहान बहिणीसह अपहरणकर्त्या महिलेच्या तावडीतून सुटका केली. १० वर्षीय संध्या गंगावणेचं, तिच्या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. कारण तिनं स्वत:सह आपल्या लहान बहिणीची अपहरणकर्त्या महिलेच्या हातावर तुरी देत सुटका करून घेतली आहे.
मुंबईतल्या देवनारमध्ये संध्या गंगावणे आपल्या आजोबांना भेटण्यासाठी आली होती. घराशेजारच्या दुकानात खरेदीसाठी गेली असता एका महिलेने तिचं आणि तिच्या मावस बहिणीचं अपहरण केलं. या बहिणींच्या अंगावर असेलल्या सोन्यासाठी या महिलेनं अपहरण केल्याचं समोर आलंय. अत्यंत शिताफीने संध्याने बहिणीसह आपली सुटका करून घेतली.
संध्या आणि तिची बहीण सुखरूप परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
संध्या आणि तिच्या बहिणीची तर सुटका झाली. मात्र अपहरणकर्त्या महिलेने पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ बालकांचे अपहरण करून त्यांचे सोन्याचे कानातले चोरले. या घटना सीसीटीव्हीत चित्रित झाल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपी महिलेला अटक केली. संजना बारिया असं अपहरण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे नीट लक्ष देण्याची गरज यावेळी पोलिसांनी बोलून दाखवली.
संध्या गंगावणे या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मात्र शक्यतो पालकांनीही मौल्यवान दागिने मुलांना घालणं टाळावं. पालकांनी आपल्या मुलांवर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे.