विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाणे (Thane Crime) शहरातील कळवा परिसरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. गोळीबाराच्या एका घटनेने कळवा (Kalwa) हादरले आहे. कळव्यातील राहत्या घरात बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कळवा पोलीस (Kalwa Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवास मध्ये राहणाऱ्या दिलीप साळवी यांच्या घरातून शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आल्याने एकच खळबळ उडाली होती. नातेवाईक आणि स्थानिकांनी घरात धाव घेतली असता दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी दोघेही मृतावस्थेत आढळले. पत्नी प्रमिला साळवी या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केलाय.
पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओखळून पोलीस उपायुक्त गणेश गावडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या घटनेचे नेमके कारण काय हे आणि मृत्यू नेमका कशामुळे झालाय, कोणी कोणाला गोळी मारली, ही हत्या की आत्महत्या की आणखी काही याबाबत पोलीस काहीही बोलण्यास नकार देत आहेत.
दिलीप साळवी यांनी प्रथम आपल्या पत्नीची हत्या करून नंतर आत्महत्या केली अशी स्थानिक सूत्रांनी माहिती दिलेली असताना पोलीस मात्र चौकशी आणि तपासा नंतरच पूर्ण घटनेबाबत खुलासा होईल असे सांगत आहेत. आम्ही चौकशी सुरू केली असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तपासाला पुढील माहिती मिळेल असे उपायुक्त गावडे यांनी स्पष्ट केलं आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरामध्ये ५७ वर्षीय पती आणि ५२ वर्षीय पत्नी या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. पत्नी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. कळवा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस सुरु आहे. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल," अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.