मुंबई : विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधा-यांना आपला निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली आहे. उन्ह्याळ्याची सुटी 1 मे पासून देण्यात यावी असे निर्देश शिक्षण विभागानं काढले होते. त्यामुळे यंदा वार्षिक परीक्षा संपल्यावरही मुलांच्या शाळांना सुटीचा आनंद घेता येणार नव्हता. पण चहू बाजूनं टीका झाल्यावर आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
आज शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी त्याविषयीची घोषणा केली. त्याआधी विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना गुणवत्ता वाढीसाठी गरज वाटली तर पुढच्या वर्षीपासून निर्णय लागू करू असंही तावडेंनी स्पष्ट केलंय. वार्षिक परीक्षा संपल्यावर निकाल लागेपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र विद्या प्राधिकरणानं हे परिपत्रकाद्वारे काढला होता. या काळात शाळांना मुलांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी उपक्रम राबवावेत अशी प्राधिकरणाने अपेक्षा केली होती.
इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या शाळांना १ मे नंतर सुट्टी देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. त्यामुळे उन्हाळाच्या सुट्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची परीक्षा झाल्यावर न मिळता राज्यातील सर्व शाळांना आता ह्या सुट्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मिळणार होत्या. त्यामुळे 1 ते 9 वीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा मार्च किंवा एप्रिल महिन्यात झाल्या असत्या तरी अशा विद्यार्थ्यांना 30 एप्रिलपर्यँत शाळेत येणे बंधनकारक होते.