मुंबई : सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही रविवारी जर बाहेर पडत असाल तर, आगोदर रेल्वेचे वेळापत्रक पाहा. अन्यथा प्रवासादरम्यान, मध्येच लटकून रहायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. कारण मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेमार्गावर कल्याण-ठाणे अपला जाणाऱ्या जलद मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे/अंधेरी असा हार्बर मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सुट्टीसाठी बाहेर पडणाऱ्या आणि सुट्टीदिवशीही कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गाच्या तुलनेत पश्चिम मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा मिळणार आहे. कारण, पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला नाही.
सकाळी ११.१५ ते दुपारी ४.२१ पर्यंत अपला जाणाऱ्या जलद मर्गावरील लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान धिम्या मार्गांवरून धावतील. तर, ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान धावणाऱ्या अपच्या लोकल जलद मार्गावर धावतील. मेगाब्लॉक काळात पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा चालविण्यात येईल. प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्याच तिकिटावर मध्य व पश्चिम मार्गावरून प्रवास करण्यास मुभा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.