पुणे : हिंदूजननायक नक्की कोण? हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेत निर्माण झाला आहे. याचं कारणही तसंच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वाचाही मुद्दा हाती घेतला. त्यामुळे मनसैनिकांनी ठिकठिकाणी त्यांचे बॅनर लावून त्यांना 'हिंदूजननायक' ही पदवी बहाल केली होती.
त्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ही अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. यावरून शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद झाला होता.
'नकलीपासून सावधान येत आहे असली' अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी झळकले. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, भाजपची पोलखोल सभा, राणा दाम्पत्य यांनी थेट मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या सभेची तयारी म्हणून शिवसेनेने टीझर्स तयार केली आहेत. यात सभा शिवसेनेची आणि गर्दी मनसेची असे फोटो टाकल्याचा आरोप मनसेनं केला आहे. त्याला शिवसेनेकडूनही उत्तर देण्यात आलंय.
उदय होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले असतानाच शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लावलेल्या बॅनरमुळे पुन्हा एकदा मनसे, शिवसेनेत जुंपली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका बॅनरचा फोटो पोस्ट करुन 'चलो मुंबई'चा नारा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावासमोर 'हिंदूजननायक' असा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे यांचा 'हिंदूजननायक' असा उल्लेख केल्यामुळे आता मनसैनिक संतापले आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या या पोस्टमुळे हिंदू जननायक नक्की कोण? उद्धव ठाकरे की राज ठाकरे याची जोरदार चर्चा जनतेमध्ये सुरू झाली आहे. तर, मनसेने पदवी ढापण्याचा प्रयत्न नको, असं शिवसेनेला सुनावलं आहे.