दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : कलानगर इथे मातोश्रीसमोर साकारणाऱ्या मातोश्री दोन इमारतीचे बांधकाम अडचणीत आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील या मातोश्री दोनच्या बांधकामासाठी टीडीआर वापरण्यास शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेनेच नकार दिला आहे.
महापालिकेने आता मातोश्री दोनचा हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला असून नगरविकास खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आता मातोश्री दोनच्या अतिरिक्त बांधकामाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्यामुळे कलानगर इथला मातोश्री बंगला हा राज्यातील एक बळकट सत्ताकेंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनंतर याच मातोश्रीवरून शिवसेनेची वाटचाल सुरू ठेवली. आजही शिवसैनिकांच्या मनात मातोश्रीबद्दल आदराची भावना आहे.
ठाकरेंच्या वाढणाऱ्या कुटुंबाला मातोश्री कमी पडत असल्याने मातोश्रीसमोरच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर 5200 चौरस फुटाचा बंगला विकत घेतला. हा बंगला पाडून या ठिकाणी आठ मजली इमारत उभी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मातोश्री दोनचे कामही सुरू झाले. मुंबई महापालिकेकडून सहा मजल्यांना सीसीही देण्यात आली. मात्र मातोश्रीचे वरचे दोन मजले अडचणीत आले आहेत.
झी 24 तासला मिळालेल्या कागदपत्रांनुसार या अतिरिक्त दोन मजल्यांना परवानगी मिळावी म्हणून मे 2017 रोजी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला. मात्र हा 2600 चौरस फुटाचा टीडीआर नियमानुसार मातोश्री दोनसाठी वापरता येणार नाही असा शेरा देत मुंबई महापालिकेने हे प्रकरण आता स्पष्टीकरणासाठी नगरविकास विभाग म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे 16 सप्टेंबर रोजी पाठवले आहे.
2600 चौरस फुटाचा टीडीआर मिळेल हे गृहित धरून मातोश्री दोनसाठी उद्धव ठाकरे यांच्यामार्फत महापालिकेकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आलाय, त्यात दोन ट्रीप्लेक्स अपार्टमेंट बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून एकूण 10 हजार 500 चौरस फुटाचं बांधकाम प्रस्तावित आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये मातोश्री दोनच्या बांधकामास सुरुवात झाली असून सहा मजले बांधून पूर्ण झाले आहेत, तर उर्वरित दोन मजले आता नियमांच्या कचाट्यात अडकले आहेत.
राज्याच्या नगरविकास विभागाने 16 नोव्हेंबर 2016 रोजी टीडीआरच्या वापराबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 9 मीटर रस्त्यांची रुंदी असेल अशा सार्वजनिक आणि महापालिकेच्या रस्त्यालगतच टीडीआर लोडींगला परवानगी देण्याचे बंधनकारक करण्यात आले.
त्यानंतर 23 ऑगस्ट 2017 रोजी महापालिकेने एक सर्क्युलर काढले, त्यानुसार खाजगी ले आऊट रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांलगत टीडीआर वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांचा मातोश्री दोनचे बांधकाम नियमात अडकले आहे.
मातोश्री दोन हे कलानगरच्या खाजगी लेआऊटवर उभे असून त्यांच्यासमोरील रस्ता हा ना सार्वजनिक आहे ना महापालिकेचा. याच कारणावरून महापालिकेने मातोश्री दोनला टीडीआर वापरण्यास परवानगी नाकारली असून अधिक स्पष्टीकरणासाठी मातोश्री दोनचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे.
खासगी रस्त्यालगत टीडीआर वापरण्यास परवानगी देता येईल का याचे स्पष्टीकरण मागवणारे पत्र 16 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांना पाठवले आहे.
कलानगरमध्येच असलेल्या मातोश्री दोनला थेट बीकेसीच्या रस्त्यावर जाण्यासाठी प्रवेशद्वारे उभारण्याची परवानगी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास विभागाने जानेवारी 2016 रोजी दिली आहे. सुरक्षेच्या कारणावरून ही परवानगी देण्यात आलीय.
16 सप्टेंबरला मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेने सरकारला अल्टीमेटम दिले आहे. याच दिवशी नव्या मातोश्रीच्या टीडीआरचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. हा निव्वळ योगायोगही असावा, पण सरकारला अल्टीमेटम देणार्या उद्धव ठाकरे यांच्या नव्या मातोश्रीची चावी आता मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे.
मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच मातोश्रीचे वरचे मजले बांधले जाणार आहेत, आता या परवानगीच्या बदल्यात मुख्यमंत्री शिवसेनेकडून काही राजकीय किंमत वसुल करणार की सहजासहजी नव्या मातोश्रीच्या टीडीआरला परवानगी देणार याबाबत उत्सुकता आहे.