अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा अडचणीत आलेत. मात्र यावेळी ते अडचणीत आलेत ते त्यांच्या विभागातील एका अधिकाऱ्यामुळे.
विनोद तावडे यांचे ओएसडी असलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांनी आपल्याकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अल्पसंख्यांक विभागातील कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी केला आहे.
तसं पत्र त्यांनी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिवांना दिलं आहे. याप्रकरणी साळुंखे यांना निलंबित करण्यात आलंय. तर सरकार चारुदत्त शिंदे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय.
अल्पसंख्यांक विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी आपल्या विभागाच्या प्रधान सचिवांना लिहलेले हे पत्र. या पत्रामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ओएसडी डॉ. चारुदत्त शिंदे चांगलेच अडचणीत आलेत. अल्पसंख्यांक विभागाकडून रस्ते बांधणी, शाळा आणि मश्जिद दुरुस्तीसाठी निधी दिला जातो.
३१ मार्च २०१७ रोजी शशिकांत साळुंखे यांनी या कामांचा जीआर प्रसिद्ध केला. मात्र या जीआरमध्ये असलेल्या कामांना या खात्याच्या मंत्री आणि सचिवांनी मंजुरीच दिली नव्हती. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जी बाब समोर आली ती धक्कादायक आहे. ३१ मार्च २०१७ रोजी २ कोटी ६० लाख रुपयांची नऊ जिल्ह्याती २६ कामे मंजूर करण्यात आली.
या कामांची यादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव आणि मंत्र्यांच्या सहीने जीआर काढण्यासाठी कक्ष अधिकाऱ्याकडे येते. मात्र कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी काढलेल्या जीआरमध्ये मंजूर केलेल्या कामांऐवजी इतर कंत्राटदारांच्या कामांचा समावेश करण्यात आला.
ही बाब आपण डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या सांगण्यावरून केल्याचा दावा साळुंखे यांनी प्रधान सचिवांना लिहलेल्या पत्रांमध्ये केला आहे. तसेच या प्रकरणात आपण डॉ. शिंदेंना मंत्रालयातच १ लाख रुपये दिल्याचा दावाही साळुंखे यांनी केलाय. याप्रकरणी शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आरोप फेटाळले आहेत. कक्ष अधिकाऱ्यांने जे आरोप केले आहेत ते सिद्ध केलेले नाहीत. त्यांनी आरोप सिद्ध केले तर कारवाई केली जाईल, असा दावा करत तावडे यांनी नबाव मलिक यांच्यावर टीका केली आहे.
विशेष बाब म्हणजे डॉ. चारुदत्त शिंदे हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे नातेवाईक आहेत. मंत्रालयात तावडे यांचे ओएसडी म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांच्याकडे धुळे जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अतिरिक्त पदभार होता. हा पदभार असताना शिंदे यांनी जवळपास 29 लोकांना अपंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे दिल्याचा गुन्हा धुळे पोलीसात दाखल आहे.
याच प्रकरणी भाजपाचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉ. शिंदे यांची नियुक्ती मंत्रालयात करू नये अशी मागणी केली होती. मात्र तरीही त्यांची नियुक्ती मंत्रालयात झाली आणि आता त्याच डॉ. शिंदे यांच्यामुळे तावडेंच्या अडचणीत वाढ झालीय.