भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?

Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 27, 2024, 07:41 AM IST
भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक? title=
Western Railway is adding 13 more AC local train services in Mumbai starting November 27

Mumbai Local News Today: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र गेल्या काही वर्षात लोकलवरील ताण वाढला आहे. गर्दी वाढत गेल्यामुळं लोकलमध्ये चढणेही मुश्किल होऊन जाते. त्यामुळं लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांची आहे. प्रवाशांच्या याच मागणीचा विचार करुन पश्चिम रेल्वेवर आता लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. (Mumbai Local Train News) 

पश्चिम रेल्वेवर गेल्याच आठवड्यात एक नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. या 12 डब्यांच्या नवीन लोकलमुळं एसी लोकलच्या 13 फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळं सोमवारी ते शुक्रवार एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 होणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी 52 वरुन 65 वर होणार आहे. या नव्या एसी लोकलमुळं पश्चिम रेल्वेवरील एकुण सेवांमध्ये वाढ होणार नसून त्याची संख्या तितकिच राहणार आहे. यात एसी लोकलच्या डाउन मार्गावर 6 आणि अप मार्गावर 7 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 

पश्चिम रेल्वेवरील नवीन एसी लोकलचा फायदा हा भाईंदरच्या प्रवाशांना होणार आहे. कारण विरारवरुन येणाऱ्या लोकल या भरुन येतात. त्यामुळं भाईंदरच्या प्रवाशांना लोकलमध्ये बसायला तर नाहीच पण चढायलादेखील जागा मिळत नाही. त्यामुळं ही एसी लोकल भाईंदरच्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या स्थानकातील नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. 

कसं असेल वेळापत्रक?

नवीन एसी लोकल बुधवारी चर्चगेटवरुन दुपारी 12.34 वाजता सुटणार आहे. तर, दररोज या नव्या एसी लोकलची पहिली फेरी सकाळी 8.30 वाजता भाईंदरहून सुटणार आहे. भाईंदर आणि चर्चगेट अशा 2-2 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, भाईंद-अंधेरी, विरार-वांदे दरम्यान 1-1 फेरी चालवली येईल. डाउन मार्गावर चर्चगेट-विरार आणि चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरीवली आणि बोरीवली-भाईंदर दरम्यान 1-1 फेरी चालवण्यात येणार आहे.