मुंबई : सध्या सगळीकडेच नवरात्रीचा सण उत्साहाने साजरा केला जात आहे. तसेच सगळीकडे सध्या दांडियाचा, गरब्याचा फिव्हर आहे. हाच फिव्हर चक्क मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला चक्क बदलापूर स्थानकात गरबा खेळत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ अगदी कमी काळात व्हायरल झाला आहे. आणि नेटीझन्सनी याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
नवरात्रीचा आजचा आठवा दिवस. तसेच आजचा रंग आकाशी. आकाशी रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालून या महिला गरबा खेळत आहेत. प्लॅटफॉर्मवर खेळतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बदलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर देखील काही महिला गरबा खेळताना दिसल्या.
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे मुंबईकर आपला बराचसा काळ हा लोकलमध्ये घालवत असतो. त्याच्या जीवनातील अविभाज्य घटक ही लोकल ट्रेन आहे. अनेकदा आपले सणवार आणि आपला आनंद या लोकल ट्रेनमध्येच शोधत असतात. असं असताना आता या महिलांनी गरबा खेळायला चक्क प्लॅटफॉर्मची मदत घेतली आहे. आपल्याला माहितच आहे की, आता रात्री 10 वाजता गरबा बंद होतो. अशावेळी लांब प्रवास करणाऱ्या महिलांना गरबा खेळणं शक्य होत नाही. म्हणून त्यांनी प्लॅटफॉर्मवरच गरबा खेळणं पसंद केलं आहे.
तसेच वर्षभर ज्या लाईफलाईनच्या मदतीने चाकरमानी प्रवास करून आपल्या इच्छित स्थळी पोहचतात तीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून रेल्वे प्रवासी दसऱ्याच्या एक दिवस आधी लोकल मध्ये दसरा सण साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो.. आज सकाळी लोकल फलाटावर येताच लोकले मोटरमन यांचा प्रवाशांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.प्रवाशांनी आपआपल्या डब्यांची सजावट केली तसेच लोकल ट्रेन मधील देवीच्या प्रतिमेचं पूजन करून आनंदोत्सव साजरा केला. यात महिलावर्ग हि मागे नव्हता लोकल येण्यापूर्वी महिलांनी फलाटावरच गरब्याचा फेर धरला...