मुंबई : फिल्मसिटीवरुन (Film City) महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जोरदार राजकारण रंगले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नोएडामध्ये (Noida) फिल्मसिटी वसवण्याची घोषणा केली आहे. तसेच फिल्मसिटी म्हणजे काही पर्स नाही, पळवून न्यायला असेही सुनावले आहे.
मुंबईतल्या बॉलिवूडवरून जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी (Film City, Noida) उभारणार असल्याची घोषणा यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केलीय. नोएडाजवळ एक हजार हेक्टरवर ही फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे स्पर्धेचे यूग आहे. फिल्मसिटी काही पर्स नव्हे की कुणी घेऊन जायला, असे टोला त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
सामाजिक सुरक्षा आणि स्थिरता देणारेच स्पर्धेत टिकतील आणि उत्तर प्रदेशात यासाठी सज्ज असल्याचं सांगत योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतल्या वातावरणावरून शिवसेनेला टोला लगावला. तर उत्तर प्रदेशातंल वातावरण पाहायचे असेल तर मिर्झापूर पाहा असा प्रतिटोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला आहे. जे पाली हिल परिसरात राहत आहेत, जुहू, बांद्रा येथे राहत आहेत, ते कलाकार नोएडात जाऊन राहणार आहेत का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.