www.24taas.com, पंकज दळवी, मुंबई
नाम बडे दर्शन खोटे ही म्हण बॉलीवूडच्या कलाकारांना अगदी चपखल बसते. त्यांच्या आदर्श व्यक्तीरेखांचा बुरखा फाडणारी माहितीच माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. अगदी मोठ्या कलाकारांवरही अनेक गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे. देशाची आर्थिक राजधानी... मुंबई म्हणजे फास्ट लाईफ.... मुंबई म्हणजे झटपट घडामोडी... मुंबई म्हणजे बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
या बॉलिवूडमधली मंडळी प्रत्यक्षात कशी राहतात. सिनेमांमधून आदर्श व्यक्तीरेखा साकारणारे खरंच तसे असतात का, का हे केवळ प्लास्टिक, कॉस्मेटीक चेहरे आहेत असे अनेक प्रश्न सर्व सामान्यांना पडतात. मात्र नुकत्याच महितीच्या अधिकारातून हाती आलेली माहिती धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सविरोधात वेगवेगळ्या कारणांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक सिनेमांमधून चरित्र व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते ओमपुरी यांच्यावर २०१० आणि २०११ या वर्षात तब्बल तीन अदखल पात्र गुन्हे दाखल आहेत. टीव्हीवर निष्पक्ष वकिलाचा रोल करणाऱ्या रोनित रॉयविरोधात २००८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्वत:ला सिंग इज किंग म्हणवणाऱ्या अक्षयकुमार विरोधात त्याची पत्नी ट्विकंल खन्ना सह वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. अभिनेता शायनी अहुजाविरोधातलं बलात्काराचं प्रकरण तर बरंच गाजलं. तसंच अभिनेता राजा चौधरीच्या गुन्ह्यांची यादी तर बरीच मोठी आहे.
तर आघाडीचा अभिनेता सैफ अली खानचं मारहाण प्रकरणही ताजंच आहे. ही झाली काही उदाहरणं... पण या कलाकारांच्या स्टारडममुळे पोलिसही त्यांच्या गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. चंदेरी पडद्यावरची लखलख, या कलाकारांचं ग्लॅमरस राहणीमान हे सारं डोळे दिपवणारं आहे पण त्यांनी केलेले गुन्हे समोर आले तर ते सामान्यांपेक्षाही सामान्य भासतात.