www.24taas.com, नवी दिल्ली
16 जानेवारीच्या रात्री भारतीय सेनेच्या दोन तुकड्या दिल्लीच्या दिशेने आल्याची खळबळजनक बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. 16 जानेवारीलाच भारतीय लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी जन्मतारखेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्याच रात्री हरियाणातील सैन्याची डिवीजन 33 आणि पॅरा ब्रिगेड 50 यांनी दिल्लीकडं कूच केलं.
गुप्तचर यंत्रणांना या घटनेची खबर लागताच त्यांनी संरक्षण मंत्रालयाला ही माहिती कळवली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयानं अलर्ट घोषित करत दिल्लीच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर तपासणी कऱण्याचे आदेश दिले. रस्त्यांवरील वाहतूक धीमी करण्याचा त्यामागे हेतू होता. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही याची माहिती दिली गेली.
मलेशिया दौऱ्यावर असणाऱ्या सुरक्षा सचिव शशिकांत शर्मा यांना तातडीनं दिल्लीला परत बोलावण्यात आलं. याबाबत शर्मा यांनी मिलीट्री ऑपरेशन डायरेक्टर जनरल यांना विचारणा केली असता हा नियमीत सरावाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र सैन्याच्या या महत्वाच्या हालचालीची माहिती संरक्षण मंत्रालयाला का कळवली नव्हती आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत येण्याची सैन्याच्या तुकड्यांना काय गरज होती, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.