येत्या मार्च १६ रोजी सादर करण्यात येणारा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता आहे, इनकम टॅक्स सवलतीची मर्यादा सध्याच्या दीड लाखावरुन दुपटीने वाढवून तीन लाख रुपये करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याखेरीज पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही, तीन ते १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी १० टक्के प्राप्तीकर, २० लाखापर्यंत उत्पन्नावर २० टक्के प्राप्तीकर आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्नधारकांसाठी ३० टक्के प्राप्तीकर अशा शिफारसी अर्थमंत्रालयाची विशेष समिती करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
या प्रमाणे बदल झाले तर कोट्यवधी करदात्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहेत. आज माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची बैठक होणार असून या सर्व प्रस्तावांवर चर्चा करण्यात येणार आहे.
भाजपाचे नेते असलेले सिन्हा यांचा डायरेक्ट टॅक्स कोड किंवा डीटीसीला आणि त्या अंतर्गत सुचवण्यात आलेल्या सुधारणांना विरोध नसल्याने केंद्र सरकारच्या या धोरणांना सरकार आणि विरोधक अशा दोघांची सहमती मिळण्याची अपेक्षा आहे.