धनं'जय'ची गोपीनाथांवर 'मात'!

परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकाला मात दिलीय. धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराची नगराध्यपदी निवड झाली असून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे.

Updated: Dec 26, 2011, 05:28 PM IST

परळी नगराध्यक्ष निवडणुकीत धनंजय मुंडेंचा उमेदवार विजयी

झी २४ तास वेब टीम, परळी

परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकाला मात दिलीय. धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराची नगराध्यपदी निवड झाली असून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे.

 

दीपक देशमुख यांना एकूण ३२ पैकी तब्बल २६ मतं मिळाली आहेत तर गोपीनाथ मुंडे यांचे उमेदवार जुगल किशोल लोहिया यांना केवळ सहा मते मिळाली आहेत.  गोपीनाथ मुंडे यांना या परावभवामुळं मोठा धक्का बसलाय. उपनगराध्यक्षपदी सुनील फड यांची निवड झाली आहे.

 

परळीच्या नगरपालिका निवडणुकीत सेना-भाजपच्या १७ उमेदवारांचा विजय झाला. त्यापैकी ११ उमेदवारानी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात स्वतंत्र मोट बांधली. यामुळे गोपीनाथ मुंडेंचा पाठिंबा लाभलेल्या जुगल किशोर लोहिया यांचा दणदणीत पराभव झाला आहे.

 

नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर परळीत धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात नगराध्यक्षपदावर वाद रंगला होता.  त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जुगल किशोर लोहिया यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यासाठी व्हिप काढलं. पण धनंजय मुंडेनी या व्हिपच्या विरोधात एक स्वतंत्र गट बनवला आणि आपला उमेदवार निवडून आणला. अखेर काका-पुतण्याच्या या लढाईत पुतण्याने बाजी मारली.

 

दरम्यान व्हिप डावलणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पक्षाच्या आदेशाला हरताळ फासल्याने धनंजय मुंडेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धनंजयसह इतर बंडखोरांना पक्षाची नोटीस पाठवणार असल्याचं ते म्हणाले.

 

लोकांच्या भावनेचा विजय आहे. या प्रक्रियेत सर्वांनी माझ्या विश्वास टाकला त्यात मी पात्र ठरलो असे मला वाटते. नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने शिस्त भंगाची कारवाई करावी, इतकी ही मोठी निवडणूक नव्हती, असे मत विजयानंतर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

 

पक्षाने व्हिप जारी केला होता. परंतु त्या विरोधात नगरसेवकांनी मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या कारवाई केली जाईल आणि त्यांना पक्षातून काढले जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. संख्येच्या आधारावर बंड करता येत नाही, विचारांच्या आधारावर आपण आपली मागणी मांडावी लागते. परंतु तसे त्यांनी केले नाही. कमळ चिन्हांवर निवडून न आलेल्या उमेदवाराला नगराध्यक्ष करणं हे पक्षाच्या कोणत्याही नियमात बसत नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

दरम्यान, पराभवानंतर गोपीनाथ मुंडे यांनी उद्विग्न होऊन धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केली. मी ज्यांना मोठे केले. तेच माझ्यावर उलटले आहे. माझ्याच माणसांनी माझ्या डोक्यात धोंडा घातला आहे. तो आता दुसऱ्यांचा काय होणार अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली. यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी झालं आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाडण्यात आले, अपक्ष उमेदवार निवडून आणले. परळीच्या जनतेची मी माफी मागतो. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला होता. पण दगाबाजीमुळे आम्हांला त्यांच्या विश्वास राखता आला नाही, असेही मुंडे यांनी सांगितले.