बिल्डरच्या गुंडांची गावकऱ्यांना मारहाण

कल्याणमध्ये बिल्डरच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत दोन गावकरी गंभीर जखमी झालेत. जमीन बळकावण्यासाठी निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डरनं मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.

Updated: Nov 10, 2011, 06:04 AM IST

झी २४ तास वेब टीम, कल्याण

 

कल्याणमध्ये बिल्डरच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत दोन गावकरी गंभीर जखमी झालेत. जमीन बळकावण्यासाठी निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डरनं मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. पोलिसांनीही बिल्डर बरोबर हातमिळवणी केल्यानं न्याय मिळणार तरी कसा ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय.

 

वडवळी गावातले गावकरी आणि निर्मल लाईफ स्टाईल बिल्डरमध्ये मागील काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. धमक्या देऊन बळजबरीनं जमीन बळकावण्याचा बिल्डरचा प्रयत्न होता. याविषयी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही बिल्डरवर कोणतीच कारवाई झाली नाही. तर या प्रकरणाची विचारणा करणाऱ्या मीडियासमोर पोलिसांनी चक्क पळ  लागला.

 

पोलिसांच्या कारवाईची भीती नसल्यानं मुजोर झालेल्या बिल्डरच्या गुंडांनी अखेर दोन गावकऱ्यांवर हल्ला केला. गुंडांच्या अमानूष मारहाणीत भगवान पाटील आणि रूपेश तरे हे गंभीर जखमी झाले. रूपेश तरे यांच्यावर आयसीयुत उपचार सुरू आहेत.

 

पोलिसच जर बिल्डरांचे रक्षणकर्ते असतील तर गावकऱ्यांना आता सुरक्षा मिळणार तरी कशी ? हा सवाल मात्र अजूनही अनुत्तरीतच राहतो.