www.24taas.com, नाशिक
नाशिक फर्स्ट समीटमध्ये कृषी, अन्न प्रक्रिया उद्योगाबरोबरच आयटी आणि गृहनिर्माण क्षेत्रातल्या जाणकारांनी शहराच्या प्रगतीचा आलेख मांडला. त्याच बरोबर भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा केली. समस्या सोडवून भविष्यात वाटचाल अधिक वेगानं करण्यासाठी ही समीट यशस्वी ठरली. नाशिकमध्ये झपाट्यानं पायाभूत सुविधा वाढत असल्यानं नाशिक गुंतवणूकीसाठी प्रेफर्ड डेस्टीनेशन ठरतं आहे.
नाशिकमध्ये कृषीक्षेत्र, वायनरी उद्योगानं मोठी भरारी घेतली आहे. विकासाची गती अधिक वेगानं होण्यासाठी इथल्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ सुरु असल्याचं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. 'झी २४ तास'च्या नाशिक फर्स्ट या समीटचा समारोप भुजबळांच्या उपस्थितीत झाला. नाशिकमध्ये उद्योगधंदे वाढावेत यासाठी पूरक वातावरण असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
याच बरोबर आणखी सुविधा मिळाल्यास आयटी क्षेत्रात नाशिक महत्त्वाचं केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. कृषी क्षेत्राततही नाशिकनं मोठी भरारी घेतल्याचं तज्ञांनी अभिमानानं सांगितलं. नाशिक फर्स्ट समीटमध्ये तज्जांनी विकासाचा रोडमॅप मांडला, त्याच बरोबर भेडसावणाऱ्या समस्यांची चर्चा केली. त्यामुळं नाशिकच्या विकासाचा महामार्ग अधिक प्रशस्त कसा करता येईल या दृष्टीनं समीट यशस्वी ठरली.