www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापुरात सध्या एक डिजिटल पोस्टर सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. कुत्रा, मांजर, पक्षी अशा मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे या प्राण्यांचे मालक आपण नेहमीच पाहतो. मात्र कोल्हापूरात म्हशीवर प्रेम करणाऱ्या एका मालकाने म्हशीचे निधन झाल्याने तिला श्रध्दांजली वाहण्यासाठी डिजिटल पोस्टर लावून दुःख व्यक्त केलं आहे.
कलानगरी कोल्हापूरात जसा तांबडा-पांढरा रस्सा आणि मटणाचे शौकीन आहेत तसे शुध्द शाकाहारींसाठी निरसं दूध देणारे दूध कट्टेही आहेत. या कट्ट्यांवर धारोष्ण दूध मिळतं. काही लोकांचा हा व्यवसायही आहे. त्यामुळे इथं म्हशींची जीवपाड जपणूक करतात. त्यांच्यासाठी स्पर्धांच आयोजन करणे त्यांना नटविणे अशी काम अगदी आवडीने करतात.
अशाच प्रेमाने सांभाळलेल्या 'झेन' या म्हशीवर जीवपाड प्रेम करणाऱ्या मालकालाही 'झेन'च्या मृत्यूने दुःख झालंय. झेन ही त्यांच्या कुटुंबाची आधार होती. त्यामुळे तिच्या जाण्याने त्यांचा आधाराच नाहीसा झाला आहे. त्यामुळेच झेनला श्रद्धांजली वाहणारा फलक शहरातील गंगावेश दूध कट्ट्यावर लागला आहे. हा डिजिटल फलक सध्या सर्व कोल्हापूरकरांचे आकर्षणाचे केंद्रचं ठरला आहे.