www.24taas.com, आळंदी
राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
इंद्रायणीच्या काठी वसलेलं हे गाव मोक्षाच प्रवेशद्वार मानलं जातं. मात्र इथल्या नागरिकांवरच पाण्यासाठी दारोदार हिंडण्याची वेळ आलीय. इंद्रायणी सारखी नदी या ठिकाणाहून वाहतेय, मात्र नागरिकाना तीचं पाणी वापरता येत नाही. कारखान्यातली रसायनं, मैला यामुळे नदीची अवस्था गटारासारखी झाली आहे.
आळंदीला दररोज पाच लाख लिटर पाण्याची गरज आहे, मात्र ते पुरवलं जात नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेनं आळंदीला पाणी देण्याचा ठराव केला. पण तो अजून प्रत्यक्ष अंमलात आलाच नाही. दुसरीकडे पाणी पुरवठा अधिकारी थातूर मातुर उत्तर देवून बोळवण करताहेत. तर पिंपरी चिंचवडमध्येच पाण्याची समस्या असताना आळंदीला पाणी कसं द्यायचं असा सवाल महापौरांनी उपस्थित केलाय. सरकार धार्मिक क्षेत्रांसाठी कोट्यवधींचा खर्च करतं,मात्र हा पैसा कुठं मुरतो असा सवाल आता उपस्थित होतोय.