झी २४ तास वेब टीम, पुणे
रिक्षाप्रवास म्हटला की, रिक्षावाल्याची अरेरावी आणि त्याची उद्धट उत्तरे असाच अनुभव बहुतांश ग्राहकांना येतो. मात्र पुण्यातील रिक्षावाले आता तुम्हाला अत्यंत सभ्यतेनं आणि कदाचित इंग्लिशमध्येही बोलताना दिसतील. रिक्षा पंचायत आणि य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षावाल्यांसाठी व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
रिक्षावाल्यांची प्रतिमा बहुतांश वेळी निगेटीव्ह अशीच समोर येते. परंतु अशी प्रतिमा आता पुण्यातल्या रिक्षावाल्यांच्या बाबतीत नसणार. कारण रिक्षा पंचायत आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षावाल्यांसाठी व्यवस्थापन पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करुन दिली. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालं नसलं तरी पूर्वतयारी अभ्यासक्रम करुन या पदव्या रिक्षाचालकांना मिळवता येणार आहे. त्यामुळं ग्राहकांशी कसं वागावं, कसं बोलावं हे शिकवण्याबरोबरच इंग्लिश स्पिकिंग, पर्यटन, विमा यांचंही ज्ञान दिलं जाणार.
रिक्षाचालकांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्याबरोबरच पुणेकरांना आता फोनच्या माध्यमातून दारात रिक्षा उपलब्ध होणाराय. काळाप्रमाण सर्वच गोष्टी आता बदलू लागल्यात. त्यात आता रिक्षावाले कसे मागे राहतील.