www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.
दत्तू शेवाळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात सतत दुष्काळाला कंटाळून गावापासून दूर त्याने कसायला जमीन घेतली... लाखांच्यावर खर्च करुन कांदा लावला... कांद्याचं चांगल पिक घ्यायचं, अंगावरची कर्ज फेडायची, अशी स्वप्न तो रंगवत होता... दुसरीकडे ७ मार्चला पोरीच्या ठरलेल्या लग्नाची तयारी सुरु होती. पण....
गारपीटीनं दत्तुची स्वप्न उद्धस्त केली. गेल्या आठवड्यात रात्रीतून अचानक गारांचा पाऊस सुरु झाला आणि दत्तूचं कांद्याचं पीक संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पीकाचं नुकसान झाल्याचं कळताच दत्तू रात्रभर झोपू शकला नाही. तळमळत कशीबशी त्यानं रात्र काढली आणि सकाळीच तो शेताकडे गेला आणि शेतातलं दृष्य पाहून पार कोसळला. मनाच्या हताश अवस्थेत दत्तूनं शेताच्या बाहेरच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
एका मेहनती शेतकऱ्याचा गारपीटीनं बळी घेतलाय. दत्तुचं कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालंय. मागे उरलेत लग्न थांबलेली मुलगी, दत्तुची म्हातारी आई आणि दत्तुची बायको जिला आता चार मुलांना एकटीनं वाढवायचं आहे. याच गारांनी आपल्या वडिलांचा बळी घेतलायं हे त्याच्या अजून नकळत्या वयातील निरागस पोरांच्या गावीही नाही... दत्तूच्या ७० वर्षांच्या आईच्या डोळ्य़ातले अश्रू आता वाळून गेलेत.
गारपीटीनं उद्ध्वस्त झालेल्या फक्त शेवाळे कुटुंबाचीच ही अवस्था नाही. या अवकाळी गारपिटीने राज्यातल्या कित्येक कुटुंबावर ही वेळ आणलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.