www.24taas.com, झी मीडिया, परळी
लोकांच्या भावना लक्षात घ्या असं म्हणत या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी येथे केली आहे. परळीत गोपीनाथ मुंडेच्या अंत्यविधीसाठी उद्धव ठाकरे आले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करत परळीकरांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. आपल्या लोकनेत्याला गमावल्यानंतर परळीकरांचा उद्रेक झाला.
मुख्यमंत्री आणि हर्षवर्धन पाटील, राज ठाकरे, माणिकराव ठाकरे, आर आर पाटील यांनी परळीमध्ये प्रवेश करताच उपस्थित जनसमुदायाने त्यांना घेराव घातला आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची जोरदार मागणी यावेळी त्यांनी केली.
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले यांनाही जनतेच्या संतापाला सामोरं जावं लागलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.