जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : मी काही दिवसांसाठी व्हॉटस अॅप डिलीट केलं, त्यानंतर दोन दिवसांनी जाणवलं की, किती शांत वाटतंय, यावर तुमचा विश्वास बसत नसेल, तर हा प्रयोग तुम्ही देखिल करून पाहा.
व्हॉटस अॅपवर पुन्हा-पुन्हा येणारे मेसेज, अनावश्यक फोटो, व्हिडीओ आणि अलर्ट यामुळे तुमची मानसिक शांतता हिरावली जातेय, याचं उत्तर तुम्हाला नक्की यानंतर मिळणार आहे.
व्हॉटस अॅपचा विरोध नाही
व्हॉटस अॅपचा मी विरोध करतोय, असं काहीही नाही. मात्र त्याचा हवसे, गवसे आणि नवसे जे अतिवापर करतायत, नको नको तसा वापर करतायत, त्याचा त्रास सर्वांना होतोय.
संबंधित मेसेज, व्हिडीओ, फोटो तुमच्याकडे पुन्हा आलाय, असा सिम्बॉल व्हॉटस अॅपकडून देण्यात येत नाही. तशी सोय व्हॉटस अॅपने करायला हवी, एक वेगळ्या रंगाने ते दाखवण्यात यावं, म्हणजे एकदा स्लाईड केलं की, हे डबल आलेले मेसेज डिलीट होतील. आपलं ऑफिसला असलेलं काम सोपं होतंय, महत्वाचा फोटो, किंवा मजकूर पाठवतोय, तर हा व्हॉटस अॅपचा योग्य वापर म्हणावा लागेल.
व्हॉटस अॅपचा नेमका त्रास कुठे होतो ते पाहा
पुन्हा-पुन्हा येणारे मेसेज, फोटो, व्हिडीओ, यात काही गोष्टी या चार महिन्यांनी, सहा महिन्यांनी आणखी तुम्हाला पाठवल्या जातात. यात तुमचा वेळ जातो, शिवाय डाऊनलोड करतांना जे थेंब थेंब पैस जातात आणि बिल आल्यावर जे तळं साचतं ते वेगळं. पण वेळ पैशांतही मोजता येत नाही, नको ते मेसेज चेक करण्याचं काम आपल्याला कुणी लावलंय, आणि हे आपण कशासाठी करतोय. ज्यांना वेळ आहे, थोडक्यात काम नाही, अशांनी टाकलेले मेसेज वेळ नसणाऱ्यांनी तपासत बसायचे, हा एक त्रासच नाही का?
व्हॉटस अॅपमुळे आपल्यांशी दुरावतोय
कदाचित तुम्ही तुमच्या मित्रांशी, मुलांशी, आईवडिलांशी बोलण या मेसेजेसमुळे टाळत असाल, बोलणं कमी होत असेल...पण विचार करा..आपण आपल्या जवळच्यांशी, जिवंत माणसांशी बोलणं कमी करतोय, त्यांच्या बोलण्याकडे आपलं लक्ष कमी झालंय, मग या बदल्यात आपण काय दिव्य करतोय, तेच ते मेसेज, तेच फोटोचे मेसेज- शुभ सकाळ, काहीही फोटो, व्हिडीओ पाहण्यात, आपण आयुष्याचा वेळ वाया घालवतोय.
आपण का वेळ वाया घालवतोय
कसलाच विचार न करता सुविचार पाठवल्यानंतर आणखी एक सुविचार, यात आज आपल्याला ऑफिसमध्ये मिटिंग आहे असा मेसेज आला, तर तो कामाचा आहे. पण व्हिडीओ डाऊनलोड करून पाहणे, हसणे, कुणाची तरी बदनामी करणारा मेसेज, क्षणाचाही विचार न करता दुसऱ्याला पाठवणे, (व्हॉटस अॅपवर मूळ मेसेज पाठवणारा कोण हे देखिल कळत नाही,) यात आपण आपला वेळ वाया घालवतोय का?, यावर विचार करा.
व्हॉटस अॅपचा योग्य वापर होऊ शकतो
व्हिडीओ पाहू नका असं म्हणता येणार नाही, ते यू-ट्यूबवरही पाहायला मिळतील सवडीनुसार, बातम्या व्हॉटस अॅपवर वाचल्या तर वाईट काहीच नाही, वर्तमान पत्र आणि वेबसाईटचं वाचन केल्य़ाने तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. 'डाळींब शेती आणि शेतकरी', या नावाचा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, त्यात ते डाळींब पिकावरील रोग नियंत्रण, उत्पादन वाढ यावर बोलत असतात, ते वेळ वाया घालवतायत असं म्हणता येणार नाही, पण नको ते मेसेज वाचण्यास वेळ जात असेल तर काय? त्याला व्यसन म्हणावं का?
"व्हॉटस अॅप पे सन्नाटा ही अच्छा है भाई...!"
व्हॉटस अॅप डिलीट करून हे प्रश्न सुटणार नाहीत, मात्र जास्तच जास्त लोकांनी कामासाठी याचा वापर केला, तर सर्वांच्या आयुष्यातील दररोजचा मेसेज तपासण्याचा वेळ आणि त्रास कमी होणार आहे. म्हणजे ग्रुपवर आणि व्हॉटस अॅपवर 'सन्नाटा' आपल्या आरोग्यासाठी पोषक आहे, म्हणून "व्हॉटस अॅप पे सन्नाटा ही अच्छा है भाई...!"
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.