प्रशांत जाधव, २४ तास डॉट कॉम, संपादक : बेस्ट ही कंपनी तोट्यात आहे, बस चालविणे परवडत नाही अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, पण नेमकं बेस्ट का तोट्यात आहे याचं कारण तुम्हांला माहिती आहे का...
मुंबईकरांची लाइफ लाइन म्हणून दोन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पाहिले जाते. एक म्हणजे लोकल आणि दुसऱी म्हणजे बेस्टची बस. लोकलनंतर मुंबईकर बहुतांशी बेस्टवर अवलंबून असतात.
पण या बेस्टला या प्रवाशांची चिंताच नाही आहे. आपल्याकडे प्रवासी आले नाही आले तरी त्यांना त्याचं देणं घेणं नाही. अनेक गाड्या या रिकाम्याच फिरतात. त्यांचं योग्य मॅनेजमेंट बेस्टकडून केले जात नाही.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी जोरदार पाऊस सुरू होता. त्या भर पावसात बेस्टची वाट पाहत किमान २५-३० जण पाहत होते. पण अर्धातास झाले बस येत नव्हती. मग काय चमत्कार झाला एक नाही दोन नाही तीन तीन बस प्रवाशांच्या सेवेसाठी हजर झाल्या. त्या पण एका मागोमाग एक... ताटकळत उभे असलेले प्रवासी पहिल्या बसमध्ये पटापट चढले. त्यानंतर दुसरी बस ही तशीच विना प्रवाशांची उभी राहिली, पहिली बस निघाली मग दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरने क्लच दाबला आणि गेअर टाकून पहिल्या बसच्या मागे आपली बस दामटली.
तिसरा ड्रायव्हर कुठे थांबतो. त्यानेही प्रवाशांची वाट न पाहता. लगेच रेल्वेचे डबे कसे एका मागोमाग लागतात, तशाच तीन बस एकामागे एक चालत होत्या.
आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी अनेकांचा विलंब झाला होता. त्यामुळे सर्व प्रवासी संतापले होते. त्यामुळे मी १८००२२७५५० या बेस्टच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावला. तेथे माझी तक्रार घेण्यात आली. बसचे क्रमांकही मी दिले. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण आजपर्यंत त्या बेस्टच्या कंट्रोलरवर कारवाई झाली की नाही मला माहिती नाही.
आजही मी ऑफीसला येत होतो तेव्हा १५ मिनिटं बस नव्हती. त्यानंतर लांबच लांब रांग पहिल्या बसमध्ये बसली आणि मी मुद्दाम तिसऱ्या बसमध्ये बसलो. तिसऱ्या बसमध्ये मिल बैठ तीन लोग. मैं, कंडक्टर आणि ड्रायव्हर... मग दोन बस पुढे... एक बस भरलेली चालली होती, दुसरी रिकामी आणि तिसऱ्या बसमध्ये फक्त मी....
मी आज पुन्हा १८००२२७५५० या बेस्टच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावला. त्यांनी बसचे नंबर लिहून घेतले. कारवाई करणार असे सांगितले माझा फोन नंबर आणि पत्ता लिहून घेतला. आता कारवाई कधी करणार याची मी वाट पाहत आहे.
दरम्यान एलफिस्टन स्टेशनजवळ बेस्टच्या या भोंगळ कारभारामुळे शेअर टॅक्सीवाल्यांचे खूप फावते. बेस्ट बसेस वेळवर येत नाही यामुळे प्रवासी एलफिन्स्टन स्टेशन ते दूरदर्शन हा प्रवास शेअर टॅक्सीतून लांबच लांब रांग लावून करतात. त्यांना माहिती आहे की प्रत्येक २-३ मिनिटांनंतर टॅक्सी उपलब्ध आहे. त्यामुळे शेअर टॅक्सीवाल्यांची चांदी होत आहे.
बेस्ट आणि टॅक्सीच्या तिकिटाचे दर सारखे आहेत. एलफिन्स्टन ते प्रा. कुरणे चौक (दूरदर्शन) या मार्गावर कमीत कमी आणि जास्तीत जास्त तिकीट ८ रुपये आहे. जलद आणि वेळवर प्रवासाची सुविधा मिळत असल्याने प्रवासी टॅक्सीला प्राधान्य देतात.
हा प्रकार फक्त एका बेस्ट स्टॉपचा असेल तर आपण समजू शकतो. मुंबईतील ८० टक्के बस स्टॉपवर असा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. मी ऑफिसमध्ये याबद्दल माहिती घेतली तर गोरेगाव, करीरोड, लालबाग, चिंचपोकळी, गिरगाव, अंधेरी येथे राहणारे आमच्या सहकाऱ्यांनी माझ्यासारखेच अनुभव शेअर केले.
बस स्टॉपवर उभे असताना अनेक प्रवासी संतप्त होते. त्यातील एकाने सांगितले की, टॅक्सीवाले या बेस्ट कंट्रोलरला हप्ते देतात. त्यामुळे ते वेळेत बस सोडत नाही. दुपारी या मार्गावर ट्रॅफिक नसते. तरीही ट्रॅफीकचे कारण सांगून एका मागे एक बस सोडतात. यावर काही होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया शैलैश पाटील यांनी माझ्याशी बोलताना दिली.
तोट्यात चाललेल्या बेस्टने या गोष्टीकडे लक्ष दिले तर मुंबईकरांचा मनस्ताप कमी होईल आणि तोट्यातील बस सेवा ही फायद्यात जाईल. लंडनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खूप सुविधाजनक आणि वेळवर असतात. अनेक जण आपल्या खासगी गाड्या शहराबाहेर सोडून तेथील सार्वजनिक बस, मेट्रोने प्रवास करतात. तेथील मेट्रोल १५० वर्षापासून सुरू आहे आणि कधी तोट्यात गेली नाही. हे येथे सांगावेसे वाटते. बाकी सर्व काही 'बेस्ट' आहे...