www.24taas.com, मुंबई
‘मटरू की बिजली का मन्डोला’ हा सिनेमा रिलीजच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतो, असं सिनेमातील अभिनेता इमरान खान याला वाटतंय.
नुकतंच, एका रेडिओशी बोलताना २९ वर्षीय इमरान खाननं म्हटलंय की, ‘एका वर्जित विषयावर हा सिनेमा बेतलेला आहे. यामध्ये वादात सापडण्यासारखं काहीच नाही, पण काही लोक मात्र त्यांना वादामध्ये खेचून आणू शकतात’.
एका गावाची कहाणी या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय. अनुष्का पंकज कपूर यांच्या मुलीची भूमिका साकारतेय तर इमरान पंकज कपूरसोबत त्याच्या कामात मदत करतोय. राजकारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शबाना आजमींच्या मुलाची भूमिका आर्य बब्बर पार पाडतोय. अनुष्का आणि आर्य बब्बरची मैत्री होते आणि हाच सिनेमाच्या कहानीचा टर्निंग पॉईंट ठरतो.
सिनेमाच्या प्रोमोमधून ‘बिजली’च्या भूमिकेतील अनुष्का चांगलीच प्रभावी दिसते. ती म्हणते, ‘माझ्यासाठी ही भूमिका कठिण होती कारण मी जो विचार करते तसंच वागतेदेखील. पण, ‘बिजली’ मात्र तशी नाही. ती आपले विचार आणि भावना प्रकट करत नाही’.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मटरू की बिजली का मन्डोला’ असं अजब नाव असलेला हा सिनेमा येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.