www.24taas.com, चेन्नई
१२-१२-१२ या सारखी शतकांतून एकदाच येणारी तारीख विशेष मानली जाते. पण ही तारीख विशेष मानण्याचं आणखी एक कारण देखील आहे. अशा दुर्मिळ तारखेला अचाट कृत्यांनी दक्षिणेत सुपरस्टारपद मिळवणाऱ्या रजनीकांतचा आज वाढदिवस आहे. अर्थात, १२-१२-१२ ही तारीख त्याच्या वाढदिवसाला शोभणारीच आहे.
रजनीकांत हे तामिळ सिनेमातील दैवी नाव. पडद्यावरील त्याची स्टाइल, त्याचा ऍटिट्यूड यांनी वेडावलेल्या फॅन्सची संख्या लक्षणीय आहे. वाट्टेल त्या स्टाइल वापरत अफाट आणि अचाट कृत्यं करून तामिळ प्रेक्षकांना वेडं करणाऱ्या रजनीकांतचे चाहते हे चाहते कमी आणि भक्त जास्त आहेत.
बंगळुरूमध्ये एका सामान्य बस कंडक्टरच्या नोकरीपासून सुरूवात करणाऱ्या शिवाजी गायकवाड याला प्रख्यात दिग्दर्शक के. बालचंदर यांनी सिनेसृष्टीत लाँच केलं. यानंतर रजनीकांत हा तामिळ सिनेसृष्टीचा बादशाह बनला. त्याने केलेले अनेक अफाट स्टंट्स खरे मानले जाऊन लोकांनी त्याला देवाचा दर्जा दिला.
त्याच्या अफाट कृत्यांवर अनेक विनोद किस्से, जोक्स सांगितले जातात. आजही ६२व्या वर्षी रजनीकांत तितकाच लोकप्रिय आहे. २०१० साली त्याने काम केलेला रोबोट सिनेमा सुपरहिट ठरला होता. गेल्या वर्षी रा.वन सिनेमातही त्याने पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं. आज त्याच्या चाहत्यांसाठी तामिळ वाहिन्यांवर दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.