www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप काळजीत आहे कारण त्याचं कुटुंब उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलंय. नवाजुद्दीनचा त्याच्या कुटुंबाशी कसाबसा संपर्क झालाय मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी त्याला सतावतेय.
नवाजुद्दीननं आपल्या जीवनातील सुरुवातीची काही वर्ष उत्तराखंडमध्येच व्यतीत केलेत. त्याची एक बहिण आणि तीन भाऊ देहरादूनमध्येच राहतात. सध्या ते सुरक्षित असल्याची माहिती त्याला मिळालीय. उत्तराखंडची राजधानी देहरादून नवी दिल्लीपासून ३४० किलोमीटर दूर आहे.
उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयानंतर झालेल्या जीवितहानीमुळे नवाजुद्दीन खूपच तणावात आलाय. ‘माझं कुटुंबच तिथं आहे ही वेगळी गोष्ट आहे... पण त्याचसोबत अनेक पर्यटक, तीर्थयात्री आणि तिथले स्थानिक लोक यावेळी मोठ्या संकटात आणि असहाय्य परिस्थितीत सापडलेत’ असं म्हणताना इथं अडकलेल्या लोकांना मदत करण्याची इच्छा नवाजुद्दीननं व्यक्त केलीय.
‘मी एका सामान्य कुटुंबातून आलोय. पण, उत्तराखंडच्या खूप चांगल्या आठवणी कायम माझी सोबत करत आल्यात. निसर्गानं या भूमीवर केलेला प्रकोप पाहून मला खूप त्रास होतोय. ही आपल्याचं करणीची फळं आपण भोगतोय असं मला वाटतंय’ असंही नवाजुद्दीनं यावेळी म्हटलंय. नुकत्याच आलेल्या 'आत्मा' या सिनेमात नवाजुद्दीन बिपाशा बासू हिच्याबरोबर दिसला होता.
१४ जून ते १७ जूनपर्यंत सलग ६० तासापर्यंत मुसळधार कोसळलेल्या पावसानं आणि ढगफूटीमुळे अलकनंदा आणि भगीरथी नदिमध्ये पूर आला होता तसंच अनेक ठिकाणी भूस्खलनही झालंय.