www.24taas.com, बंगळुरू
‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पुन्हा एकदा सचिन कधी निवृत्ती घेणार? या प्रश्नावर सचिनसोडून इतरांचा खल सुरू झाला.
यंदाचा कॅस्ट्रॉल ‘सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ पुरस्कार सचिनला मिळालाय. पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी पुन्हा हाच प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना ‘जेव्हा जेव्हा माझे डोळे उघडतात तेव्हा माझ्यासमोर एकच लक्ष्य असतं आणि ते म्हणजे क्रिकेट... ज्यादिवशी बॅट पकडताना मला आनंद होणार नाही त्यादिवशीपासून मी खेळणं सोडून देईन... पण, अजून तरी तो क्षण आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा मी स्वत:च सगळ्यांना ही गोष्ट सांगेन’ असं म्हणत सचिननं प्रश्न विचारणाऱ्यांचं तोंड बंद केलं. गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळता खेळता सचिननं शतकांची शंभरी पार केलीय.
तर यावेळी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन डे क्रिकेटमध्ये दोन शतकं ठोकणाऱ्या सलामीवीर वीरेंद्र सेहवागला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘देशासाठी शंभर टेस्ट खेळणं हेच सध्याचं माझ्यापुढंच लक्ष्य आहे’ असं त्यानं यावेळी म्हटलंय. यावेळी सेहवागनंही सचिनचं कौतूक केलं. सचिननं ज्यावेळी शतकाची शंभरी ठोकली त्याक्षणाची आठवण त्यानं यावेळी सर्वांसमोर ठेवली. ‘त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की जर सचिन १९० ते २०० रन्स दरम्यान बाद झाला तर सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजववायच्या. पण नेमकं सचिननं शतक ठोकलं आणि सगळेच खेळाडू, स्टाफ बाल्कनीमध्ये जमा झाले आणि टाळ्या वाजवून आपला आनंद केला. तो आनंद शब्दांत वर्णन करणं कठिणच आहे’ असं म्हणत सेहवागनं सगळ्यांच्या डोळ्यासमोर अक्षरश: तो दिवस उभा केला.