www.24taas.com, मुंबई
१०वीचे निकाल लागल्यानंतर आज ऑनलाइन तिसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे आता तिसऱ्या ऑनलाइन यादीकडे लागून राहिले आहे. प्रवेशासाठी एकूण १ लाख ९२ हजार ९१६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यामुळे तिसऱ्या यादीनंतर प्रवेश प्रक्रियांचे चित्र स्पष्ट झालेले असेल. अनेक विद्यार्थ्यांचा कल हा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा असाच असतो.
मात्र नामांकित कॉलेजच्या जागा पहिल्या यादीतच भरल्या असल्याने आता विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये प्रवेश घेणं भाग पडणार आहे. आज १० जुलै सायं. ५ वाजता तिसरी यादी जाहीर होणार आहे. पहिल्या आणि दुसर्या यादीनंतरही सुमारे ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लटकलेलेच असून या विद्यार्थ्यांसाठी उद्याची यादी ऑनलाइन प्रवेशाची शेवटची संधी असणार आहे.
पहिल्या आणि दुसर्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी खूपच कमी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पहिल्या यादीत १ लाख ६४ हजार ६७५ तर दुसर्या यादीत ५१ हजार ७९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यापैकी अनुक्रमे ८७ हजार ६३६ व २२ हजार विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला.
- तिसरी यादी : १० जुलै, सायं. ५ वाजता.
- महाविद्यालयात : ११, १२ जुलै (सकाळी १० ते दुपारी ४) प्रवेश घेणे.
- ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रिक्त जागांचा तपशील वेबसाइटवर तसेच महाविद्यालयात सूचना फलकावर जाहीर करण्यात येणार आहे.
- एटीकेटीचे विद्यार्थी, सीसीई परीक्षा उत्तीर्ण झालेले सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी तसेच आयजीसीएसईची संभाव्य गुणपत्रिका असणार्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइननंतर महाविद्यालयस्तरावर ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.