www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॉलेजला अॅडमिशन तर घ्यायचेय आणि वेबसाईट मात्र इंग्रजीमध्ये. कशी समजणार आता कॉलेजेसची माहिती? कोणत्या कॉलेजमध्ये आहेत कोणते कोर्स? यांसारखे अनेक प्रश्न मुलांना भेडसावतात. याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि मराठी भाषा जतन करण्यासाठी शिक्षण प्रशासनाने कॉलेजच्या वेबसाईट मराठीतून करण्याचे ठरवलेय.
मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी सर्व कॉलेजेसमध्ये वेबसाईट मराठीत करण्यात याव्यात असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिलेत. राज्यातील अनेक विद्यार्थी कॉलेजचे शिक्षणही मराठीत घेताना दिसतात. नॅक मूल्यांकनासाठी वेबसाईट असणे जरुरीचे असते यासाठी प्रत्येक कॉलेज स्वत:ची वेबसाईट बनवत असतात.
पण या सगळ्या वेबसाईट इंग्रजीतून आहेत. या वेबसाईट मराठीत करण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यी संघटनेच्या प्रतिनिधींनी राजेश टोपे यांच्याकडे ही मागणी केली. तसेच मराठी भाषेची अवहेलना थांबवण्यासाठी लगेचच पावले उचलली जावीत यासाठी टोपे यांनी ही सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिली अशी माहिती विद्यार्थ्यी संघटनेचे सरचिटणीस अॅड. अजय तपकीर यांनी दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.