www.24taas.com, पिंपरी - चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नेत्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात तिकीटं मिळाली आहेत. एका आमदारानं तब्बल पाच नातेवाईकांना तिकीटं मिळवून दिली आहेत. तर खासदारानं घरातच तीन तिकीटं घेतली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रस्थापीत नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात तिकीटांची बरसात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार असलेल्या आमदार विलास लांडे यांच्या तब्बल पाच नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये लांडेंच्या पत्नी मोहिनी, भाऊ विश्वासनाथ, जावई महेश लांडगे, भाचा अजित गव्हाणे याशिवाय मावस बहिणीचा मुलगा शरद बोऱ्हाडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याही काही नातेवाईकांना तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र नातेवाईकांना तिकीटं दिली हे मान्य नाही.
शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनीही घरातल्यांसाठी तीन तिकीटं घेतली आहेत. त्यामध्ये पुतण्या योगेश, वहिनी माधुरी बाबर आणि दुसऱ्या वहिनी शारदा बाबर यांना तिकटं दिलं आहे. बाबर यांना मात्र यात गैर काहीच वाटत नाही. सर्व पक्षात कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याला केवळ पक्षाचं काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही.