Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri On Bhagwangad: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. असं असतानाच या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत मंत्री धनंजय मुंडेचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात आहे. अशातच बीडमधील भगवानगडाचे महंत नमादेव शास्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. असं असतानाच आज सरपंच संतोष देशमुखांचे नातेवाईक आज महंत नामदेव शास्रींची भेट घेण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पुरावे दाखवण्यासाठी पोहोचले आहेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुराव्याची फाईल घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भगवानगडावर दाखल झाले आहेत.
महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंबाकडून भेट घेतली जाणार असून ते या प्रकरणासंदर्भात चर्चा करणार आहे. भगवानगडानंतर देशमुख कुटुंब बीड मधील नारायणगडावर देखील जाणार आहे. यानंतर नारायण गडावरची भेट देखील अतिशय महत्त्वाची आहे. मात्र भगवानगडाबरोबर नारायगडावर देशमुख कुटुंब जी फाईल घेऊन गेलं आहे त्यामध्ये नेमकं आहे तरी काय? हेच जाणून घेऊयात...
1) मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशी हत्या केली? या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे याचे पुरावे फाइलमध्ये आहेत.
2) विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहेत याचेही पुरावे सदर फाइलमध्ये आहेत.
3) संतोष देशमुख हत्या प्रकरण किती भयंकर होते आणि किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचे पुरावे महंतांना दाखवण्यात आले.
4) संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी धनंजय देशमुख आणि विष्णू चाटेमध्ये काय संवाद झाला याची माहिती देखील धनंजय देशमुख देणार आहेत.
5) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी पवनचक्की प्रकल्पावर अशोक सोनवणे नावाच्या गार्डला कशा पद्धतीने मारहाण केली याचे पुरावे दाखवले.
6) संतोष देशमुख यांना मारहाण करता वेळेस आरोपींकडून व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. 'मोकारपंती' ग्रुपवर हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. याचे देखील पुरावे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांच्याकडे दिले.
7) खंडणी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असल्याचा देखील पुरावा देखील देशमुख कुटुंबाने दिला आहे.
8) संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अगोदर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह खंडणी प्रकरणातील आरोपींची झालेल्या बैठकीचे देखील पुरावे महंतांकडे दिले आहेत
9) मंत्री धनंजय मुंडे यांना हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात का जबाबदार धरले जाते यासंदर्भातील देखील काही गोष्टी महंत नामदेव शास्त्री यांच्यासमोर मांडल्या आहेत.
10) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतरचा शवविच्छेदन रिपोर्टमधील मारहाणीचा फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो देखील महंतांना दाखवला.
11) मकोका कारवाई आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची व्यवसायामध्ये असलेली भागीदारी याचे देखील पुरावे नामदेव शास्त्रींकडे दिले आहेत.
12) आरोपी वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. असा आरोप होतोय. धनंजय मुंडे मंत्री असल्याने तपास यंत्रणेवर ते दबाव देत आहेत.