U19 Womens T20 World Cup 2025 : भारताच्या महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा अंडर 19 टी 20 वर्ल्ड कपवर (U19 Womens T20 World Cup 2025) आपलं नाव कोरलं आहे. रविवारी अंडर 29 महिला वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना पार पडला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (India VS South Africa) संघांमध्ये झालेल्या या फायनलमध्ये भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करून विजयासाठी 83 धावांचे दिलेले टार्गेट भारताने अवघ्या 68 बॉलमध्ये पूर्ण केले आणि सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले.
टीम इंडियाची ऑल राउंडर खेळाडू गोंगाडी त्रिशा हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना त्यांच्या ३ विकेट्स घेतल्या. फायनल सामन्यात अशी कामगिरी करणारी त्रिशा पहिली गोलंदाज ठरली आहे. याआधी हा विक्रम भारताच्या तितास साधूच्या नावावर होता, तिने निक्की प्रधानच्या नेतृत्वाखाली 68 चेंडूत 2 विकेट्स घेतल्या होत्या. गोंगाडी त्रिशा हिने फलंदाजीतही कमाल दाखवली. त्रिशा हिने 33 बॉलमध्ये 44 धावा केल्या. फायनलनंतर गोंगाडी त्रिशा हिला प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा : टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन्स! फक्त 68 बॉल खेळून जिंकला वर्ल्ड कप, विजेत्या ट्रॉफीवर कोरल नावं
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेल्या दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीला लागोपाठ विकेट गमावल्या. आफ्रिकेकडून माइकी वान वूर्स्ट हिने सर्वाधिक 23 धावा केल्या. संघातील केवळ 4 फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले, तर 4 फलंदाज शुन्यावर बाद झाले. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 82 धावांवर ऑल आउट केले. गोंगाडी त्रिशा हिने दक्षिण आफ्रिकेच्या ३, पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर शबनम शकील याने एक विकेट घेतली.