www.24taas.com, झी मीडिया,
मुंबई सेंट्रल स्थानकावर एनआयए आणि आयकर खात्यानं मध्यरात्रीनंतर केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आलेत. या प्रकरणी पोलिसांनी ४७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नोटा मोजण्याचं काम सुरू असून ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
याच चार ट्रकांकडे आता अवघ्या मुंबईचं लक्ष वेधून घेतलय. कारण मालवाहू असणा-या या ट्रकात चक्क नोटांच्या बॅगा भरल्या होत्या.. या ट्रकांची ज्यावेळी तपासणी झाली तेव्हा सगळेच जण हादरुन गेलं..
४ ट्रक
१५० बॅगा
२५०० कोटी रूपये ?
हे ट्रक याघडीला मुंबईच्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या बाहेर उभे करण्यात आले.. ट्रका या क्षणाला रिकामे असले तरी अजुनही त्याच कुतूहलाने पाहिलं जातेय.. याच ट्रकातून या तब्बल १५० बॅगांमधून गुजरातला पाठवले जात होते २५०० कोटी रूपये... ज्या शहरात एक एक नोट कमवण्यासाठी चाकरमानी अहोरात्र घाम गाळतात त्य़ा शहरात चार ट्रकात चक्क पैशांच्या बॅगा भरुन ट्रेनमधून दुस-या राज्यात पाठवला जातोय.. आणि असा पैसा कि ज्याचा मालक कोण याबद्दलच प्रश्नचिन्ह अजुनही कायम आहे..
समोर आलेल्या माहितीनुसार गुजरातच्या वेगवेगळ्या शहरात या बॅगा पोहोचणार होत्या.. मात्र त्याआधीच नॅशनल इन्विसिटीगेशन एजन्सी..आणि इन्कम टॅक्स विभागानं ही संयुक्त कारवाई केली.. आणि याच संय़ुक्त कारवाईत भलीमोठी रक्कम पकडण्यात आलीय. चार ट्रकमध्ये भरून या बॅगा आणण्यात आल्या होत्या.. गुजरात मेलने या बॅगा रवाना होण्याची तयारी सुरू होती. मात्र त्याच आधी एनआयए आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापा मारून या बॅगा ताब्यात घेतल्या. दोन्ही डिपार्टमेंटना याबाबत टीप मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये १०० पेक्षा जास्त ऑफीसर सहभागी झाले. ट्रकच्या ड्रायव्हर क्लिनर्ससह एकूण ४७ जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. रात्रभर त्यांची चौकशी करण्यात आली. हवाला रॅकेटमधून ही रोकड जमल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मात्र अजूनही कॅमेऱ्यासमोर थेट प्रतिक्रिया देण्यास अधिकारी तयार नाहीत.
सुत्रांच्या माहितीनुसार ही २५०० कोटींची रक्कम आहे. मात्र एनआयए आणि इन्कमटॅक्स विभागाने अजून काही स्पष्ट केलंलं नाही. ट्रक आणि ट्रेनच्या माध्यमातून इतकी मोठी रक्कम पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र पैसा कोणत्या शहरात चालला होता.. कोणाला मिळणार होता.. कशासाठी हा पैसा चालला होता या प्रश्नांची उत्तरं चौकशीतूनच बाहेर येतील. पण तोपर्यंत या भल्यामोठ्या रकमेभोवती फिरणार प्रश्नचिन्ह कायमच राहणार आहे...
मुंबईत सुमारे १५० बॅगांमध्ये भरलेल्या त्या नोटा आणि दागदागिने कोणाचे आहेत हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय. ही सगळी माया कोण आणि कुठे पाठवत होता.ही रोकड ब्लॅकमनी होती का आणि हवालाच्या मार्फत पाठवली जात होती की, यामागे एखादी दहशतवादी लिंक होती... एनआयए आणि इन्कमटॅक्स विभाग याच प्रश्नाचं उत्तर आता शोधतोय..
या त्याच नोटा आहेत, ज्य़ा सोमवारी मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर असलेल्या ट्रकात साप़डल्या होत्य़ा.. सोमवारी रात्री एनआयए आणि आयकर विभागाने घातलेल्या धाडीत दिडशे बॅगेत ही कोट्यवधींची माया जप्त करण्यात आलीय. चार ट्रकातून सापडलेली ही रक्कम मोजण हे आता एक मोठं आव्हान तपासयंत्रणेसमोर ठाकलय.. आयकर विभागाचे एक दोन नाही तर तब्बल १८० कर्मचारी टेलर मशीनने ही सगळी रक्कम मोजण्यात गुंतले आहेत. या क्षणापर्यंत मोजलेल्या रकमेची मोजदाद २०० कोटीपर्यंत गेलीय. बॅगामध्ये साप़डलेले हिरे दागदागिने यांची मोजगाग करणे अजुन बाकी आहे. या धाडीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार ही सगळी बेहिशेबी मालमत्ता सराफ आणि हिरे व्यापा-यांची असू शकते.. आणि ही सगळी रक्कम आंगडिया मार्फत पाठवली जात होती..
आतापर्यंत सुमारे २५ आंगडिया ऑपरेटर समोर आलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार साप़डलेल्या थैल्यात त्यांची कन्साईनमेंट होती. त्या ऑपरेटरनी केलेल्या दाव्यानुसार ते सोने आणि हि-यांची डिलिव्हरी करतात. पण ते पैशाची वाहतूक करत नाहीत असा त्यांचा ठाम दावा आहे
एनआयए आणि आयकर विभागानं मारलेल्या या धाडीनंतर हा प्रकार पहिलाच नसून या अगोदरही असे प्रकार घडले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा सुरु झालीय. या बॅगा सापडल्य़ानंतर ज्यावेळी त्या उघडल्या गेल्या त्यावेळी ती प्रचंड रक्कम पाहून सारेच जण चक्रावले होते. या प्रकरणात चौकशीसाठी सात ट्रक ड्रायव्हरांबरोबरच ४७ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय..
कोट्यवधी