www.24taas.com, झी मीडिया, इचलकरंजी
राज्यातल्या यंत्रमागधारकांसमोर वीज दरवाढीचे मोठे संकट उभं राहिलय. वीज वितरण कंपनीकडं अनेकदा मागणी करुनही दरवाढ रद्द करण्यात न आल्याने इचलकरंजी शहरातील संतापलेल्या यंत्रमागधारकांनी गुरुवारपासून पाच दिवसांचा बंद पुकारलाय. त्यामुळं इचलकरंजीतील (मिनी मॅचेस्टर) कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय.
दुष्काळात तेरावा महिना, अशी यंत्रमागधारकांची अवस्था झालीय. सूतदरात झालेल्या घसरणीमुळं वस्त्रोद्योग आर्थिक संकटात सापडला असतानाच, सप्टेंबर महिन्यापासून वीज वितरण कंपनीनं दरवाढ केल्यामुळं यंत्रमागधारकांची परिस्थिती बिकट झालीय. यंत्रमागधारकांना यापूर्वी १ रुपये ३० पैसे दरानं मिळणारी वीज आता ४ रुपये २० पैसे इतक्या दरानं मिळतेय. परिणामी दर महिन्याला येणा-या बिलात दुप्पट तिप्पट वाढ झालीय. या वीज दरवाढीच्या विरोधात इजलकरंजी शहरातले साधे लुमधारक आणि ऑटो लुमधारकांनी आजपासून पाच दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
यंत्रमागधारकांच्या या निर्णयामुळं इचलकरंजीतील ६० ते ७० कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झालीय. ६० हजार कामगारांच्या हाताला काम नाही... त्यामुळं हातावरचं पोट असणा-या कामगारांची अवस्था बिकट झालीय. राज्य सरकारने याप्रकरणी मंत्री समिती नियुक्त केली.. पण त्या मंत्री समितीची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळं याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वीजग्राहक व औद्योगिक संघटनेनं दिलाय.
यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळतोय. राज्य सरकारनं तात्काळ वीज दरवाढ रद्द करुन यंत्रमागधारक आणि उद्योजकांना दिलासा द्यावी अशी मागणी होतेय. मिनी मॅचेस्टर अशी ओळख असणा-या इचलकरंजी शहरातल्या वस्रोद्योगाला मंदीमुळं आधीच घरघर लागलीय. त्यात वीज दरवाढ झाल्यामुळं हा उद्योग तरणार कसा, हा गहन प्रश्न निर्माण झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ