शिर्डीच्या साईबाबा संस्थानाची कोटीच्या कोटी उड्डाणं

शिर्डीच्या साईबाबा संस्थानची स्थापना होवून तब्बल ९० वर्षांचा काळ लोटलाय. या काळात साईसंस्थानच्या उत्पन्नानं कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली आहेत. स्थापनेवेळचे २३०० रुपये कुठे आणि या वर्षीचे केवळ रोख स्वरुपातील २७४ कोटी रुपये कुठे?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 3, 2013, 10:00 AM IST

www.24taas.com, शिर्डी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानची स्थापना होवून तब्बल ९० वर्षांचा काळ लोटलाय. या काळात साईसंस्थानच्या उत्पन्नानं कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली आहेत. स्थापनेवेळचे २३०० रुपये कुठे आणि या वर्षीचे केवळ रोख स्वरुपातील २७४ कोटी रुपये कुठे? सोने,चांदीच्या भेटवस्तू तर वेगळ्याच राहिल्या. साई संस्थानच्या उत्पन्नात प्रतिवर्षी २० टक्यांनी वाढ होत आहे
१९१८ साली साईबाबांचं महानिर्वाण झालं. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी शिर्डीत साई मंदिर देखभालीसाठी साई संस्थानची स्थापना झाली. त्यावेळी संस्थानंचं उत्पन्न होतं केवळ २३०० रुपये इतकं. अलिकडच्या काळात मात्र साई संस्थानच्या उत्पन्नाची कोटीच्या कोटी उड्डाणं पहायला मिळतायत. साई संस्थानकडं असलेली गंगाजळी आता आठशे कोटींच्या पल्याड गेली असून विविध बँकेत 803 कोटी रुपये जमा आहेत. सन २०१२ मध्ये संस्थानला तब्बल २७४ कोटींची देणगी मिळालीय. ही केवळ रोख स्वरुपातील. ३६ किलो सोने आणि ४४० किलो चांदी दान स्वरुपात मिळालेली वेगळीच. तर ८ कोटी ३० लाखांची रक्कम विदेशी भक्तांनी विविध देशांच्या चलन स्वरुपात दिली. तसंच चेन्नई येथील साईभक्त के.व्ही.रमणी यांनी सुमारे ११० कोटी रुपये खर्चून १५ हजार साईभक्त राहू शकतील असे भव्य भक्त निवास बांधून दिलंय.
संस्थानकडं मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या वस्तू दान स्वरुपात येत असल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा ठरलाय. संस्थान सोने-चांदी वितळवून त्यापासून साईंचे शिक्के तयार करते आणि ते साईभक्तांना विकले जातात. सोन्याचे हार, मुकुटही साईभक्तांना लिलावातून प्रसाद स्वरुपात दिले जातात. संस्थानाकडं एवढं कोट्यवधींचं दान येत असताना ते स्वीकारण्याची पध्दत मात्र अजूनही पारदर्शी नाही. तसंच या निधीचा विनीयोगही योग्य त-हेनं होताना दिसत नसल्याचं साईभक्तांचं म्हणणं आहे.